भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा

मुंबई, ८ जुलै- खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भगिनींनी अभिनंदनाचं ट्वीटदेखील केलं नसल्याने या चर्चेला बळ मिळालं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांतून व्यक्त होत असला, तरी केवळ वारसा आणि प्रस्थापित यापेक्षाही पक्षात इतरांनाही संधी मिळते हा संदेश दिला जात असल्याचं मानले जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे, असा प्रश्न पडला आहे.
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी केंद्रातील किंवा राज्यातील कोणत्याही मंत्र्याचं अभिनंदन केलं नसून, त्या नाराज असल्याची चर्चा असल्याचं प्रवीण दरेकर यांना आज गुरुवारी पत्रपरिषदेत विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, अभिनंदन केलं नाही किंवा ट्विट केलं नाही, असं सांगताना त्यांनी कुठे नाराजीदेखील व्यक्त केलेली नाही याकडेही लक्ष द्यावं लागेल.

Leave a Reply