पदभार स्वीकारताच नारायण राणेंनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

नवी दिल्ली : ८ जुलै – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर आज सर्व मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांनी लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी राणे यांनी पहिल्याच दिवशी आपल्या दणका दाखवत अधिकाऱ्यांना चांगलेच झापून काढले. त्यामुळे दिल्लीतील सरकारी बाबूंमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
नारायण राणे आपल्या तडाखेबाज फटकेबाजीमुळे कायम चर्चेत असतात. आता राणे हे केंद्रीय मंत्री झाले आहे. आज सकाळी नारायण राणे यांनी आपल्या मंत्रिपदाचा परभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर राणे कामाला लागले. राणेंनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. पण अधिकारी आज बैठकीला तयारी करून आले नव्हते. त्यामुळे राणे यांनी आपल्या सर्व स्टाफला बाहेर काढून मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला.
मंत्रालयात किती अधिकारी अनुपस्थित आहे याची माहिती मागितली. ‘मी मंत्रालयात पदभार घ्यायला येणार आहे हे माहीत असताना देखील तयारी का केली नाही’, असा सवाल करत राणेंनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. प्रत्येक अधिकाऱ्यांनी बैठकीला येताना नोट सोबत आणावे असे देखील सुनावले.
जवळपास 1 तासाच्या बैठकीत 30 मिनिट अधिकाऱ्यांची राणेंनी झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे. राणेंनी झाडाझडती घेतल्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना उत्तर दिले. ‘कोणतंही खातं छोटं किंवा मोठं नसतं. मी जेंव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि मी जेंव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे’ असं राणे म्हणाले.

Leave a Reply