नवी दिल्ली: ८ जुलै- केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रिपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडील केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. अमित शहा यांच्याकडे हे मंत्रीपद आल्याने राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा आहे. अशात, शहा यांच्याकडे सहकार खात्याचा कार्यभार देण्यात आल्याने राज्यातील सहकार चळवळीत मत्तेदारी असलेल्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या जरंडेश्वर सारख कारखान्यावर केंद्रीय यंत्रणांनी अलिकडेच जप्तीची कारवाई केली. या शिवाय इतर ३० कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्याची मागणीही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यातच आता शहा यांच्याकडे सहकार खात्याचा कारभार आल्याने राज्यामध्ये सहकार चळवळीत आघाडीवर असणाऱ्या राष्ट्रवादीला पूर्वी सारखा मुक्त वाव मिळणार नाही, हे स्पष्टच आहे. भविष्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीचे संबंध कसे राहतील यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहे. राज्यामध्ये भाजपाला शह देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाल्यास त्याला केंद्रातील सहकार खात्याच्या माध्यमातून उत्तर दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.