एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

पुणे:८ जुलै-राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज गुरुवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झालेत. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे सध्या अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केल्यानंतर एकनाथ खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आलं होतं. दरम्यान, ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर, खडसे हे गुरुवारी पत्रपरिषद घेणार होते. मात्र त्याआधीच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादीच्या ट्विटरवरुन देण्यात आली होती. त्यानंतर खडसे ईडी चौकशीला जाणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. पण, आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी ईडीच्या चौकशीसाठी जाणार असल्याचे सांगितले होते.
एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मी भाजपा सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर माझ्यावर चौकशी सुरू झाली आहे, असा आरोप केला. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे.

Leave a Reply