स्मार्ट सिटीअंतर्गत भूकंप प्रतिरोधक इमारती

नागपूर : ७ जुलै- केंद्र शासनामार्फत लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक शहरे तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत नागपूरची निवड करण्यात आली आहे. त्या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी सुविधा, भूकंप प्रतिरोधक दर्जेदार इमारतीमधे जागा देत त्यांचा जीवनमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न असल्याचे नागपूर स्मार्ट अँण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत क्षेत्राधिष्ठित विकास करण्यासाठी मौजा पारडी, भरतवाडा, पूनापूर व भांडेवाडी येथील १७३० एकर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. या क्षेत्रासाठी विशेष रूपाने प्रारूप नगररचना परियोजना तयार करण्यात आली असून, त्यास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ६८ मधील तरतुदीनुसार मंजुरी आहे. योजनेच्या माध्यमातून या क्षेत्राचा नियोजनबध्द विकास करण्यात येत आहे. नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत परियोजनेच्या क्षेत्रामध्ये मौजा पुनापूरमध्ये रस्त्याच्या विकास कामांतर्गत विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी तीन इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे, अशी माहितीही भुवनेश्वरी यांनी दिली.

Leave a Reply