सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कुठल्याही ठरला जाण्याचे ठरवले आहे – हसन मुश्रीफ यांची टीका

अहमदनगर : ७ जुलै – महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर ईडी आणि सीबीआयकडून चौकशीचा ससेमिरा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी कुठल्याही टोकाला जायचं ठरवलं आहे. ईडी आणि सीबीआय यांना याच कामासाठी ठेवलं आहे, असा घणाघात मुश्रीफ यांनी केलाय.
कुणाला कुठेही ते अडकवतील, कुणाच्याही मागे लागतील, त्यांनी सर्व निती नियम गुंडाळून डोक्याला बांधले आहेत. सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, हे सरकार १०० टक्के पाच वर्षे टिकेल कुणी काहीही करु शकत नाही, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी इम्पेरिकल डाटा महत्वाचा आहे. मात्र कोरोना काळात जनगणना करणं शक्य नाही. २०११ चा डेटा केंद्राकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तो डेटा केंद्रानं दिला तर तत्काळ आरक्षण मिळेल, असंही मुश्रीफ म्हणाले.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत झालेल्या जोरदार राड्यानंतर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावरुन आता भाजप नेत्यांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरु केलीय. याबाबत विचारलं असता, भाजपचे निलंबित आमदार न्यायालयात गेले तरी हा विधिमंडळाचा अधिकार आहे. हा विधिमंडळाच्या आवारात घडलेला प्रकार आहे त्यामुळे कोर्ट हस्तक्षेप करत नाही, असा दावाही मुश्रीफ यांनी केलाय.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका सुरुच ठेवली आहे. त्यावर गोपीचंद पडळकरांना अशा ठेवणीतील शिव्या देऊ की त्यांना रात्रभर झोप येणार नाही, असा इशाराही यावेळी मुश्रीफ यांनी दिला होता. पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी यामागे बोलावते धनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असल्याचाही आरोप केला होता.

Leave a Reply