संपादकीय संवाद – राज्य सरकारची रिक्त पदे भरण्याची घोषणा म्हणजे वरातीमागून घोडे आणण्याचा प्रकार

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र सरकार खळबळून जागे झाले आहे त्यांनी एमपीएससी सदस्यांच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीच मात्र त्याशिवाय राज्यात रिक्त असलेली ११ हजार ५०० पदेही तातडीने भरण्याची घोषणा केली आहे.
११५०० रिक्त पदे भरणार म्हणजे ही पदे रिक्त होती हे राज्य सरकारने मान्य केले आहे. अशी पदे रिक्त का ठेवली जातात याची माहिती लोकांसमोर येणे गरजेचे आहे. आपल्याकडे बरेचदा बऱ्याच पदांवरील अधिकाऱ्याची बदली झाल्यावर किंवा तो निवृत्त झाल्यावर ती पदे रिक्त ठेवत लवकर भरली जात नाही. त्यात अनेकदा विहित स्वार्थही दडले असतात. अनेकदा त्या पदांवर कुणी व्यक्ती येण्यास तयार नसते. विशेषतः मुंबई पुणे परिसरातील अधिकारी किंवा कर्मचारी विदर्भ मराठवाड्यात येण्यास तयार नसतात. जर एखाद्याची बदली केली तर सदर व्यक्ती राजकीय दबाव आणून आपली बदली रद्द करून घेतो मग ती पदे रिक्त राहतात. कालांतराने ती पदे व्यपगत होतात. इतिहासाची सखोल तपासणी केल्यास विदर्भ मराठवाड्यातील अनेक पदे व्यापगस्त झालेली दिसतील. त्यामुळेच मग त्या परिसरात ते पदच नसेल तर त्या पदाशी संबंधित नागरिकांची कामे होणार तरी कशी? हा प्रश्न निर्माण होतो.
अनेकदा अनेक पदांवर नियुक्ती करण्यासाठी अर्थखातेही अडथळे आणते असे बोलले जाते. मधल्या काळात एमपीएससीने परीक्षा घेऊन या पदांसाठी काही उमेदवार निवडूनही ठेवले आहेत. मात्र राज्यशासनाचे अधिकारी ती पदे भरूच देत नाहीत त्यासाठी आर्थिक कारणे पुढे केली जातात सध्यातरी संपूर्ण देशातील नोकरशाहीला कोरोना हे चांगले कारण सापडले आहे. आधी एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचीच मारामार आणि आता परीक्षा झालीच तर निवडलेल्या मुलांच्या मुलाखती घेण्यास कुणीच नाही अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मग उमेदवार वर्षानुवर्षे वाट पाहत निराश होतात आणि प्रसंगी आत्महत्येचे पाऊल उचलतात.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता शासनाने रिक्त होणाऱ्या जागा तत्काळ भरण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. एका परीक्षार्थ्यांची दुर्दैवी अखेर झाल्यावर ही घोषणा करणे म्हणजे वरातीमागून घोडे आणण्याचा प्रकार म्हणावा लागेल. त्यातूनच मग लायक विद्यार्थी निराश होतात आणि प्रसंगी ते आत्महत्येचा विचार करतात.
देशाची तरुणाई अश्या प्रकारे निराश होणार नाही याची महाराष्ट्रापुरती तरी जबाबदारी राज्यसरकारने घ्यायला हवी उशिरा का होईना त्यांना हे शहाणपण सुचले त्याबद्दल त्यांचे स्वागतच करायला हवे

अविनाश पाठक

Leave a Reply