भंडारा : ७ जुलै – रेल्वेचा स्निफर डॉग रॉकीने तब्बल ३३ किलो गांजा पकडला. रेल्वे टॉयलेटच्या छतावर पॅकेटमध्ये गांजा लपवून ठेवला होता. मात्र स्फोटक तपासणीसाठी रेल्वे पोलिसांसह ट्रेनमध्ये चढलेल्या रॉकीने ३ लाख २९ हजार रुपये किमतीचा गांजा शोधून काढला. पुरी- अहमदाबाद एक्स्प्रेस भंडारा रेल्वे स्टेशनवर थांबली असताना हा प्रकार घडला.
रेल्वेतून गांजा तस्करी करण्यासाठी आरोपी काय प्रकार करतील, याचा काही नेम नाही. असाच काही प्रकार भंडारा रेल्वे स्थानकावर अनुभवाला आला. रेल्वे टॉयलेटच्या छतावर लपवून ठेवलेला 33 किलो गांजा रेल्वेच्या स्निफर डॉगने पकडून दिला. ही घटना पुरी- अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये घडली.
भंडारा रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली असताना, रेल्वेचा स्निफर डॉग रॉकी याला घेऊन रेल्वे पोलिस गाडीत शिरले. ट्रेनमध्ये एखादा स्फोटक पदार्थ तर नाही, याची तपासणी ते करत होते. यावेळी स्निफर डॉग रॉकी S-4 कोचमधील टॉयलेटजवळ येऊन थांबला. तो सतत काही तरी शोधत असल्याचं दिसताच रेल्वे पोलिसांनी नीट तपासलं. तेव्हा टॉयलेटच्या छतावरील स्क्रू सैल झालेले दिसले.
रेल्वे पोलिसांनी स्क्रू काढून पाहिले असता गांजाची पाकिटं भराभर खाली पडली. त्यांची तापसणी केली असता हा गांजा 3 लाख 29 हजार 750 रुपये किमतीचा, तर 33 किलो वजनाचं असल्याचं समजलं. रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे. रेल्वेच्या रॉकी डॉगने 33 किलो गांजा पकडून दिल्याने रेल्वे विभागाद्वारे त्याचं कौतुक केलं जात आहे.