भंडारा: ७ जुलै- राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग निर्मूलन पंधरवाडा उपचार मोहीम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात सध्याच्या घडीला तीन हजारावर रुग्ण आहेत. जिल्ह्यात हत्तीरोग वाढतो आहे. तीन हजाराच्या वर असलेला आकडा पाहता भंडारा जिल्ह्यात ही मोहीम तेवढ्या प्रभावीपणे राबविली जात नाही की काय, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील १८ जिल्हे हत्तीरोगप्रवण जिल्हे म्हणून ओळखले जात होते. त्यापैकी १२ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वीरित्या राबविली गेल्याने हे जिल्हे हत्तीरोगमुक्त झाले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमधील सामुदायिक उपचारांची मोहीम बंद करण्यात आली आहे. राज्यात केवळ सहा जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जात असून, त्यात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
भंडारा जिल्ह्यात ३११० रुग्ण आहेत. यात भंडारा तालुक्यात ६६४, पवनी ६९३, तुमसर ३०९, लाखांदूर ३४१, लाखनी ४६५, मोहाडी ३३१, साकोली ३०७ रुग्ण आहेत. हत्तीरोगाचे उच्चाटन व्हावे म्हणून हे अभियान राबविण्यात येते. यासाठी स्वतंत्र यंत्रणाही शासनाकडून उभारण्यात आली आहे.