यवतमाळ : ७ जुलै – आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत २०१४ ते २०१७ या कालावधीत बॅच ४२ ते ५० मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना वाहनचालकांचे प्रशिक्षण देण्यात आले. एसटी महामंडळामार्फत एमओ टेस्ट आणि जानेवारी २०२१ रोजी मौखिक चाचणी घेण्यात आली. १५ जानेवारीला १८० विद्यार्थ्यांची वाहनचालक म्हणून अंतिम निवड करण्यात आली. मात्र, सात महिन्याचा कालावधी लोटूनही रुजू करून घेण्यात आले नसल्याने आज या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी एक तर रुजू करा नाहीतर आत्मदहनाही परवानगी द्या, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
मागील सात महिन्यांपासून एसटी महामंडळात निवड होऊनही रुजू करून घेण्यात आले नसल्याने जिल्ह्यातील मंत्री, आमदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आले. मात्र कुठलाच उपयोग झाला नाही. शेवटी या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आत्मदहनाची परवानगी मागितली.
निवड झालेल्या उमेदवारांचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. यानंतरही महामंडळात रूजू करून न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यास याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील, असा इशारा महेंद्र मानकर यांनी दिला.