ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

2 may dilip kumarमुंबई: ७ जुलै- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज बुधवारी निधन झालं. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईमध्ये दिलीप कुमारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.
दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

Leave a Reply