गायीच्या शेणापासून निर्माण केला जाणारा पेंट ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था बदलणारा ठरेल – नितीन गडकरी

नागपूर : ७ जुलै – गायीच्या शेणापासून तयार करण्यात येणारा खादी प्राकृतिक पेंट कृषी, ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बदलणारा ठरेल. देशातील साडे सहा लाख गावांमध्ये हा पेंट तयार करणारे कारखाने सुरु व्हावेत, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या गायीच्या शेणापासून तयार करण्यात येणार्या प्राकृतिक पेंटच्या कारखान्याचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते आभासी कार्यक्रमातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
नितीन गडकरी यांनी यावेळी खादी ग्रामोद्योग आयोगाला ५०० लिटर डिस्टेंपर व ५०० लिटर इनामल पेंट विकत घेण्याची ऑर्डर दिली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार करण्यासाठी कृषी, आदिवासी, ग्रामीण आणि मागास भाग भ्रष्टाचार, आतंक, उपासमार, बेरोजारीपासून मुक्त होऊन या भागाचा शाश्वत विकास होणार नाही, तोपर्यंत आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होणार नाही.
समाजाच्या शेवटच्या माणसाचा विकास साधताना जोपर्यंत शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत आमचे स्वप्न साकार होणार नाही, असे सांगताना नितीन गडकरी म्हणाले- पं. दीनदयाल उपाध्याय यांचे अंत्योदयाचे चिंतन आमची जीवननिष्ठा आहे. खादी प्राकृतिक पेंटचा कारखाना सुरु करणारे हे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे गावे समृध्द, संपन्न होतील. गायीचे संरक्षण होईल. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊन रोजगार मिळेल. अशा स्थितीत कुणीही गाय विकणार नाही. या प्रकल्पाच्या प्रयोगाने नवीन सामाजिक आणि आर्थिक चिंतन दिले आहे. कृषी, ग्रामीण व आदिवासी भागात एक तंत्रज्ञान विकसित होणार असल्याचेही ते म्हणाले.
देशातील साडेसहा लाख गावांमध्ये हा प्रकल्प सुरु व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- एक कारखाना सुरु होऊन चालणार नाही, तर पारदर्शक, सोपी पध्दत, परिणामकारक आणि वेळेत निर्णय घेणारी पध्दत हा प्रकल्प नव्याने सुरु करण्यासाठी असावी. या प्रकल्पामुळे ग्रामीण विकासाचा प्रारंभ होणार आणि ग्रामीण तंत्रज्ञान अधिक मजबूत होणार आहे. एक गाय, एक कडूलिंबाचे झाड आणि एक परिवार, या अर्थव्यवस्थेला चालना देणारे हे पाऊल आहे, याकडेही नितीन गडकरी यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply