केंद्र सरकारने केली सहकार मंत्रालयाची स्थापना

नवी दिल्ली: ७ जुलै- राजधानी दिल्लीत सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील फेरबदलांमुळे वेगवान हालचाली सुरू आहेत. नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर आणि धोरणात्मक आराखडा तयार करण्याचं काम हे मंत्रालय करणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना या मंत्रालयाची घोषणा केली होती. केंद्र सरकारने प्रसिद्धी पत्रकातून या मंत्रालयाबाबतची माहिती दिली आहे. या मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला बळ मिळेल. या मंत्रालयाच्या माध्यमातून प्रशासकीय, कायद्यांचा आणि धोरणात्मक कार्यप्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. तसेच सहकारी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी ते कामी येईल. याद्वारे सहकारी संस्थांबद्दल नागरिकांमधील विश्वास वाढून त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला आहे. या मंत्रालयाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी निर्णयामुळे कृषी आणि ग्रामीण भागात समृद्धीची नवी पहाट उगवेल, असं शहा यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply