नवी दिल्ली : ७ जुलै – मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रीमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. अशावेळी कामगिरी चांगली नसल्याचं सांगत काही विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आलाय. तर 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. कामगिरीच्या आधारावर जर फेरबदल होत असतील तर पंतप्रधान मोदींनीही पदावरुन बाजूला झालं पाहिजे, असा टोला सुरजेवाला यांनी लगावलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मंत्रिमंडळ विस्तार फक्त ‘डिफेक्टर एडजस्टमेंट एक्सरसाईज’ असल्याची टीका सुरजेवाला यांनी केलीय. जर कामगिरीच्या आधारावर मंत्रिमंडळात फेरबदल केले जात असतील तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पदाचा राजीनामा द्यावा. कारण त्यांच्या कार्यकाळातच चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केलाय. अमित शाह यांनीही गृहमंत्रीपदावरुन दूर व्हावं. कारण, त्यांच्या कार्यकाळातच मॉब लिंचिंग आणि कस्टोडियल डेथसारखे गंभीर प्रकार घडले आहेत. नक्षलवाद्यांनीही डोकं वर काढलं आहे, अशा शब्दात सुरजेवाला यांनी सिंह आणि शाह यांच्यावरही जोरदार टीका केलीय.
धर्मेंद्र प्रधान यांनीही पेट्रोलियम मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांच्या कार्यकाळात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कोरोना संकटातील खराब कामिगीरीमुळे डॉ. हर्षवर्धन यांनी राजीनामा द्यावा. तर अर्थव्यवस्थेतील मिसमॅनेजमेंटमुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही राजीनामा द्यायला हवा, असा टोला सुरजेवाला यांनी लगावलाय. सरतेशेवटी नरेंद्र मोदींनीही पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला हवा. कारण त्यांनी देशातील शांतता कचऱ्यात ढकलली आहे, अशी घणाघाती टीकाही सुरजेवाला यांनी केलीय.