मुंबई : ६ जुलै – विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल सभागृहातील अभूतपूर्व गोंधळानंतर व अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, गैरवर्तनचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. या कारवाई विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक विशेष आठवण करून दिली आहे.
“गैरवर्तन केल्याप्रकरणी १२ आमदारांना निलंबित करण्यात आल्याबद्दल भाजपा निषेध व्यक्त करत आहे. प्रिय देवेंद्रजी तुम्ही हे कसं विसरू शकता की, याच सभागृहात २२ मार्च २०१७ रोजी १९ आमदारांना (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) गैरवर्तन केल्याबद्दल निलंबित करण्याचा प्रस्ताव संमत झाला होता. हिंमत दाखवा आणि म्हणा तुमची १९ संख्या ही १२ पेक्षा जास्त आहे.” असं संजय राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
या अगोदर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले होते की, “आता बारा आमदारांचं निलंबन झालेलं आहे. हा एक शिस्तीचा भाग आहे. शिस्ती मोडली जाते, अशाने सभागृहात दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत आपण पाहिलं. काही वेळेला बिहार, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आम्ही पाहिलं आहे. संपूर्ण दंगलीसारखं चित्र निर्माण झालं होतं. महाराष्ट्रात अशा परंपरा पडू नये, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतला असेल.”
तसेच, “कोकणात एक म्हण आहे, ‘केले तुका, झाले माका’; बॉम्ब त्यांच्या हातातच होता. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण एक चूक किती महागात पडू शकते. बेशिस्त वर्तन महाराष्ट्राच्या विधानसभेत चालत नाही,” असा टोला देखील राऊत यांनी भाजपाला लगावलेला आहे.