नागपूर: ६ जुलै- गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शाळा बंद असल्याने विदर्भात शालेय गणवेश निर्मिती उद्योगाला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मंदीमुळे व्यापाऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा झाला असून, विदर्भातील १५ हजारावर शिवणकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्यावर्षी करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हापासून सलग दुसऱ्या वर्षीही शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या नाहीत. त्याचा मोठा फटका शालेय तयार कापडाच्या व्यवसायाला बसला आहे. विदर्भात एका मोठय़ा इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या कपडय़ाची खरेदी एक कोटीच्या घरात असते. अशा विदर्भात सुमारे पाचशेवर शाळा व महाविद्यालये आहेत. लहान मुलांच्या शाळेपासून तर महाविद्यालयालादेखील गणवेश असल्याने एक विद्यार्थ्यांला किमान दोन ते तीन जोडी गणवेशाचे दरवर्षी खरेदी करावे लागतात. विदर्भात विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात असून येथील तयार शालेय गणवेशाच्या उद्योगात दरवर्षी कोटय़वधींची उलाढाल होत असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाईन झाल्याने विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची खरेदी थांबली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या पंधरा हजार शिवणकाम कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. गेल्यावर्षी व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणत गणवेशाच्या तयारीसाठी कापड खरेदी केले. मात्र लगेच टाळेबंदी लागू झाली आणि शाळा बंद करण्यात आल्याने त्यांनी खरेदी केलेले कापड तसेच पडून आहेत.
बाजारात दुकाने थाटून शालेय गणवेश विकणारे व्यवसायिकही अडचणीत आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शाळा असल्याने विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केले नाही. त्यामुळे विदर्भातील चारशेपेक्षा अधिक शाळांच्या तयार गणवेशाची विक्री झाली नसल्याने किरकोळ विक्रेतेही आíथक संकटात सापडले आहे.