मुंबई:६ जुलै- राज्याच्या विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मंगळवारीदेखील असंच काहीसं वातावरण दिसून येत आहे. एकीकडे भाजपच्या आमदारांनी विधानभवनाबाहेर प्रतीसभागृह भरवलं असताना, सभागृहात देखील सत्ताधारी पक्षाकडून गंभीर मुद्दे मांडण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी यावेळी बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले. २०१६-१७मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला. मी खासदार होतो, त्यामुळे माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काही कारण नव्हतं. पण, माझा फोन टॅप केला आणि माझं नाव अमजद खान ठेवलं गेलं, असं नाना पटोले यावेळी सभागृहात म्हणाले. तसेच, आपल्यासोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पीए, तसेच खासदार संजय काकडे यांचादेखील फोन टॅप करण्यात आला, असाही आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.
यावेळी नाना पटोले म्हणाले, कुणाचीही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही. धर्मातही हेच म्हटलं आहे की कुणाच्या गोष्टी आपण ऐकल्या तर ते पाप असतं. आता सुसंस्कृत लोकं असं राजकारण करत असतील तर माहिती नाही. आपल्याला मुसलमानांचंच नाव म्हणजे अमजद खान का टाकलं? यावर त्यांनी आक्षेप घेतला. सरळ माझंच नाव टाकायला हवं होतं. या पद्धतीने हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून धर्माच्या नावाने राजकारण करून राज्य पेटवायचं हा उद्देश होता का? असा सवाल त्यांनी केला. २०१७-१८ च्या काळात पुणे पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून हे फोन टॅप केले गेले. कुणाच्या आदेशाने हे झाले? या सगळ्या गोष्टींची माहिती गृहमंत्र्यांनी आम्हाला द्यावी. आमच्यावर आरोप लावले की ही व्यक्ती कोणतंही काम, व्यवसाय करत नाही. अंमली पदार्थांची तस्करी करत आहे. हे माझ्यावरच नाही, तर जितक्या लोकांचे फोन टॅप झाले, त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला. किती लोकांचे, कुणाचे फोन टॅप केले गेले याची माहिती हवी, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.