मुंबई : ६ जुलै – महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सोमवारी इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसींच्या) राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पहायला मिळात आहेत. अध्यक्षांच्या दालनाबाहेर झालेल्या गोंधळाचा संदर्भ देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहातील भाजपाच्या सदस्यांकडून काल तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धमकावण्यात आल्याचा आरोप केलाय. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीही बदल्याचं राजकारण झालं नाही. मात्र कालच भाजपाच्या एका सदस्याने भास्कर जाधवांना अनिल देशमुख करण्याची आणि भुजबळ करण्याची धमकी दिल्याचं पटोले म्हणाले.
एकीकडे भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाबाहेर प्रतीसभागृह भरवलं असताना सभागृहात देखील सत्ताधारी पक्षाकडून गंभीर मुद्दे मांडण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी यावेळी बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. “२०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला. मी खासदार होतो, त्यामुळे माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काही कारण नव्हतं. पण माझा फोन टॅप केला आणि माझं नाव ठेवलं गेलं अमजद खान”, असं पटोले सभागृहात म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी हा सर्व प्रकार पुणे पोलिस कश्मिशनच्या माध्यमातून करण्यात आला. हे कोणाच्या आदेशाने झालं हे समोर आलं पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली. सध्या भाजपाचे खासदार असणाऱ्या रावसाहेब दानवेंपासून ते माजी खासदार संजय काकडेंपर्यंत अनेकांचे नंबर टॅप करण्यात आल्याचा आरोप पटोलेंनी केला.
पुढे बोलताना भाजपावर निशाणा साधत त्यांनी भाजपाचं राजकारण हे गुंड प्रवृत्ती आणि राडा करणाऱ्या प्रवृत्तीचं असल्याचा आरोप पटोलेंनी केला. इतर राज्यांमध्ये बदल्याचं राजकारण होत असेल तर महाराष्ट्रात असं राजकारण कधी झालं नाही. काल आपल्या दालनामध्ये झालेला गोंधळानंतर एक सदस्य भास्कर जाधवांना सांगत होते की, तुम्ही बोललात तर तुमचाही अनिल देशमुख करुन टाकू. बाहेरही सांगताना भुजबळ करुन टाकू अशी धमकी या सभागृहामध्ये दिली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. पुण्यातील कलादिग्दर्शक राजू सापते यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आत्महत्या प्रकरणाचाही भाजपा आमदाराशी संबंध असल्याचा आरोप पटोले यांनी केला. राजू सापते प्रकरणामध्ये ज्या संघटनेची व्यक्ती पकडली गेली, त्या संघटनेचा अध्यक्ष भाजपाचा आमदार आहे. त्यांचं नाव देखील समोर आलं पाहिजे, असं पटोले म्हणाले.
पटोले यांनी मांडलेल्या प्रश्नांवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तरं दिली. मागील काळात करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सभागृहाला त्याची माहिती देण्यात येईल, असं वळसे पाटील म्हणाले. त्याचबरोबर भास्कर जाधवांना मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली जाईल, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.