निलंबन मागे न घेतल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही – बावनकुळेंचा इशारा

नागपूर : ६ जुलै – पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजप आमदारांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केल्यानंतर भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलं. आमदारांच्या निलंबनानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज नागपुरात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला इशाराच दिलाय.
भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी त्यांनी आज नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन दिलं. त्याचबरोबर राज्यात ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी सरकारमधील काही झारीतले शुक्राचार्य कारणीभूत आहे, असा घणाघातही बावनकुळे यांनी केलाय. डिसेंबर २०२२ पर्यंत राज्यातील ८० टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होईपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळू न देण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि १२ आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ठराव घेतला आहे. विधान मंडळाचा वापर राजकारणाकरिता केलाय, अशी टीका भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Leave a Reply