नागपुरात ८ लाख रुपयाची एमडी जप्त, तीन आरोपी अटकेत

नागपूर : ६ जुलै – गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गिट्टीखदान परिसरात सापळा रचून तीन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीची एमडी जप्त केली.
अंकित राजकुमार गुप्ता (वय २८), ऋतिक रितेश गुप्ता (वय २०, दोन्ही रा. सतरंजीपुरा) आणि ऋषभ प्रभाकर सोनकुसरे (वय २० रा. तीननल चौक, इतवारी) अशी अटकेतील तरुणांची नावे आहेत. तिघांनी मुंबईहून मोठ्या प्रमाणात एमडी आणल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली होती. त्यानुसार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने गिट्टीखदान परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली.
त्यांच्याकडून आठ लाख २८ हजार रुपये किमतीची एमडी, कार व तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ही एमडी मुंबईतील बडा तस्कर मामू याच्याकडून आणल्याची माहिती असून पोलिसांनी मामूविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply