नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

नागपूर : ६ जुलै – भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपुरात आज भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं गेलं. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांचे पुतळे जाळण्यात आले. नागपुरातील बडकस चौकात हे आंदोलन झालं.
महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि १२ आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ठराव घेतला आहे. विधान मंडळाचा वापर राजकारणाकरिता केलाय, अशी टीका भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
अधिवेशनाचा पहिला दिवस नि:संशय शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या नावावर राहिला. कारण त्यांनी जे केलं किंवा काही कारणानं जे काही सभागृहात घडलं, त्यामुळे भाजपचे १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित झाले. भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला आणि त्याचाच फायदा आघाडी सरकारनं घेतला.
शिवसेना नेते भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला. मोदी सरकारनं म्हणजेच केंद्रानं ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला डाटा केंद्रानं द्यावा अशी मागणी करणारा ठराव मांडण्यासाठी भूजबळ उठले. त्याला विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्याचं म्हणनं होतं की, या ठरावाची नोटीस नाही, हे असं करणं नियमात बसत नाही, फडणवीस विविध कामकाज नियमांचा हवाला देत आक्रमक झाले.

Leave a Reply