नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात आढळला दुर्मिळ काळा बिबटय़ा, वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह

भंडारा : ६ जुलै-भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील नवेगाव क्षेत्रात दुर्मिळ काळा बिबटय़ा आढळला आहे. विशेष म्हणजे, या वेळी एक सामान्य बिबटय़ाही या काळ्या बिबटय़ाबरोबर फिरत होता. यापूर्वी २०१९मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, २०२० मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आणि सिंधुदुर्गातील आंबोली घाटात काळा बिबटय़ा आढळल्याची नोंद आहे. काळा बिबटय़ा आता नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातही आढळल्याने वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकारांमध्ये उत्साह संचारला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पहिल्यांदा काळा बिबटय़ा आढळला तेव्हा अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. मात्र, शरीरात ‘मॅलनीन’ रंगद्रव्य अधिक प्रमाण असल्यास शरीर काळे दिसते. त्यामुळे बिबटय़ाच्या शरीरावरील ठिपकेही दिसत नाहीत, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात नंतर तो अनेकदा दिसला. पेंच व्याघ्रप्रकल्पात पहिल्यांदा पर्यटकांना काळा बिबटय़ा दिसला, पण त्याचे दर्शन काही सेकंदांचेच होते, त्यामुळे त्यांचे छायाचित्र काढता आले नव्हते. त्यानंतर मात्र पर्यटकांच्या कॅमेऱ्यांनी त्याला कैद केले. तेव्हापासून काळ्या बिबटय़ाला पाहण्यासाठी ताडोबाकडे जाणारे पर्यटक नंतर पेंच व्याघ्रप्रकल्पाकडे वळू लागले. भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब यांनी ‘ट्विटर’वर छायाचित्र प्रसारित केल्यानंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात काळा बिबटय़ा आढळल्याची माहिती जगजाहीर झाली.

Leave a Reply