केंद्राने केले मोठे फेरबदल, ४ नवे राज्यपाल नियुक्त

नवी दिल्ली : ६ जुलै – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांची मंगळवारी कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आली. यासह अन्य तीन नेत्यांना राज्यपाल केले गेले आहे. तसेच चार राज्यात फेरबदल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात राष्ट्रपती भवनातर्फे आठ राज्यांत राज्यपाल नियुक्त किंवा फेरबदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी आणखी बऱ्याच केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. अनेक मंत्र्यांना संघटनेत तर काही मंत्र्यांंना घटनात्मक पद दिले जाऊ शकते. यासह अनेक मंत्र्यांचे विभाग बदलण्याचेही वृत्त आहे.
नवीन राज्यपालांमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मिझोरमचे राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशचे भाजप नेते डॉ. हरि बाबू कंभपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत गुजरात भाजप नेते मंगूभाई छगनभाई पटेल यांना मध्य प्रदेशचे राज्यपाल केले गेले आहे. गोवा भाजपा नेते राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची देखील हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली गेली.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली. त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंड राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली. यासोबत हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुरात तर मिझोरमचे राज्यपाल पी.एस. पिल्लई यांची गोवा राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावर चंद्र गहलोत सध्या मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आंध्र प्रदेशात आहेत. यादरम्यान, त्यांनी राज्यपाल पदी नियुक्ती केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
गहलोत म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद तसेच उच्च नेतृत्व यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करत मला कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. मी त्यांची इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मी उद्या भाजपच्या प्राथमिक सदस्यता, राज्यसभेचे सदस्य आणि मंत्री पदाचा राजीनामा देईन,”

Leave a Reply