मुंबई: ६ जुलै- विधानसभेच्या आज मंगळवारच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजामध्ये विधानसभा तालिका अध्यक्षांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर थेट निवेदन देणारे आमदार रवी राणा यांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश आज दिले. आमदार रवी राणा शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा व्हावी, असे निवेदन थेट अध्यक्षांना देण्याचा प्रयत्न करत होते. पण असे निवेदन थेट देता येत नाही. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चेच्या वेळी आपण सहभाग घ्यावा असेही भास्कर जाधव यांनी सांगितले. पण रवी राणा यांनी त्यावेळी राजदंड पळवला.
स्टंटबाजीला फार महत्व देऊ नका असाही टोला भास्कर जाधव यांनी यावेळी लगावला. रवी राणा यांना सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश भास्कर जाधव यांनी दिले. मार्शलला बोलावून भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना बाहेर काढले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा राजदंड पुन्हा सभागृहात आणण्यात आला.
शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा असून त्यावेळी तुम्ही सहभागी व्हा असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांबाबतची भूमिका आणि स्टंटबाजी यांच्यातील फरक हा विधानसभा सदस्यांनी ओळखावा असेही जाधव म्हणाले. रवी राणा यांच्यासारख्या आमदारांचा हेतू हा चर्चा करायचा नाही, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे. पण त्यासाठी चर्चेचा वेगळा वेळ ठेवला आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.