हिंदू, मुस्लिम मूलतः एकच – डॉ. मोहन भागवत

नवी दिल्ली : ५ जुलै – भारतात मुस्लीम व्यक्ती राहू शकत नाही, असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही असं स्पष्ट मत प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. तसंच हिंदू-मुस्लीम ऐक्य’ हे दिशाभूल करणारे आहे, कारण हिंदू-मुस्लीम मूलत: एकच आहेत असंही ते म्हणाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील मुस्लीम राष्ट्रीय मंचने आयोजित केलेल्या ‘हिंदुस्थान फर्स्ट, हिंदुस्थानी बेस्ट’ या कार्यक्रमात भागवत बोलत होते.
“आपण लोकशाही देशात असल्याने हिंदू किंवा मुस्लीम यांचे वर्चस्व असू शकत नाही असं सांगताना ’सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. त्यामुळे ‘भारतात इस्लाम धोक्यात’ या भयचक्रात मुस्लीमांनी अडकू नये,” असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. “झुंडबळीच्या गुन्ह्यत सामील असलेले लोक हिंदू नाहीत, ते हिंदुत्वविरोधी आहेत,” असं प्रतिपादन त्यांनी केलं.
हिंदू-मुस्लीमांमधील संघर्षांवर विसंवाद नव्हे, तर संवाद हाच एकमेव उपाय आहे, असेही ते म्हणाले.”आपण लोकशाही देशात आहोत. त्यामुळे देशात हिंदू किंवा मुस्लीम यांचे वर्चस्व असू शकत नाही, तर देशात केवळ भारतीयांचेच वर्चस्व असले पाहिजे,” असं भागवत यांनी सांगितलं. “ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. परंतु एकीचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचे संचित असले पाहिजे,” असंही भागवत म्हणाले. “लोकांमध्ये धर्मावरून भेदभाव केला जाऊ शकत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केले.
झुंडबळीच्या गुन्ह्य़ांत सामील असलेल्या हिंदूंबाबतही भागवत यांनी भूमिका स्पष्ट केली. “झुंडबळी घेण्यात सामील असलेले लोक हिंदुत्वविरोधी आहेत. तथापि, झुंडबळीचे काही खोटे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत,” असंही त्यांनी नमूद केले.
‘‘मी प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा मतपेढीच्या राजकारणासाठी या कार्यक्रमास आलेलो नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ना राजकारणात आहे ना त्याला प्रतिमा जपण्याची चिंता आहे. संघ देशाला मजबूत करण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी काम करतो,’’ असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply