सासरा आणि जावयाचा एकाच दिवशी अपघाती मृत्यू

चंद्रपूर : ५ जुलै – चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळील हिरापूर येथे शवविच्छेदनसाठी सासऱ्याचा मृतदेह नेत असतानाच वाटेत अपघात होऊन जावयाचाही मृत्यू झाला. आई व मुलीचे एकाच दिवशी पुसले गेले कुंकू! ही हृदयद्रावक घटना रात्री घडली. शनिवारी सायंकाळी ६ वाजता हिरापूर येथील किसन चिडाम यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. गावातील पिकअप भाड्याने घेतली गेली आणि त्यात मृतदेह ठेवून नातेवाईक व काही गावकरी शवविच्छेदनासाठी चिमूरकडे निघाले.
मात्र, रस्त्यात या पीकअप वाहनाला चिमूर जवळील खरकडा येथे अज्ञात ट्रकने धडक दिली. या अपघातात पीकअप गाडीच्या वाहन चालकासह अन्य सहा जण गंभीररित्या जखमी झालेत. त्यात जावई शंकर गोमा खंडाते (48) हेही होते. गावातील लोकांनी सर्वांना ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले. शंकर खंडाते यांचा रविवारी पहाटे 4 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमीमध्ये वाहनचालक रतन सोनटक्के, हरीश पंचवटे, गजानन कनाके, विजय चिडाम, राजू (सर्व रा. हिरापूर), तर डोंगरगाव येथील दिलीप गोमा खंडाते गंभीर जखमी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध 279, 337, 338 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply