अमरावती:५जुलै- विदर्भात संत्रा उत्पादन शेतीकरिता वरदान आहे. पण आता तो शाप ठरत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणत: दीड लाख हेक्टरवर संत्र्याचे उत्पादन घेतल्या जाते. परंतु, या वर्षी मृग बहार, आंब्या बहार या दोन्ही बहाराने धोका दिलेला आहे. त्यामुळे हेक्टरी ५० हजार रुपयांची शासकीय मदत करण्याची मागणी राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
उन्हाळ्यामध्ये ताण दिल्यानंतर मृगाचा चांगला पाऊस झाला, तरच संत्र्याला मृगबहार येतो. परंतु या वर्षी अवकाळी पाऊस आला. अवकाळी पावसामुळे जमिनीला योग्य ताण मिळाला नाही आणि त्यामुळे मृगबहार आला नाही. जे बगिचे मृग बहाराकरिता सोडलेले होते, ते आज मृग बहाराच्याशिवाय रिकामे आहेत. त्यामुळे ९० टक्के शेतकरी मृग बहारापासून वंचित आहेत. दुर्दैवाने हा निसर्गाचा खेळ हवामानावर आधारित विम्याच्या निकषांमध्ये बसत नाही, त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, असे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनामार्फत बांगलादेश सरकारला आयात कर कमी करण्याकरिता विनंती केलेली आहे. त्याचे परिणाम काही दिवसात निश्चितपणे पाहायला मिळतील, असेही ते म्हणाले.