विधिमंडळात उमटले स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद

मुंबई: ५ जुलै- एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने केलेल्या आत्महत्येचे पडसाद आज सोमवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला, तर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी एमपीएससी परीक्षेच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले, सभागृहाचा पहिला दिवस असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. ही बाब वेदनादायी आहे. अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये, अशी सरकारची भूमिका आहे.
एससीबीसी प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत. याच दरम्यान, कोविडची साथ आली. यात एमपीएससी आयोगाला स्वायत्तता दिलेली असल्याने आयोगाने परीक्षा रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. आयोगाच्या अध्यक्षांशी संपर्क केला. स्वायत्तता दिलेली असली, तरी अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा निर्णय योग्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना सांगितलं, अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहाला दिली.

Leave a Reply