नवी दिल्ली: ५ जुलै-काँग्रेस नेतृत्वासंदर्भात पक्षांतर्गत मतभेद असतानाच पक्षामध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच बदलांचा एक भाग म्हणून लोकसभेमधील आपला नेता बदलण्याचा विचार काँग्रेसकडून केला जात आहे. सूत्रांनुसार, वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचं नाव लोकसभेमधील काँग्रेसचे नेते म्हणून सध्या आघाडीवर आहे.
सध्या या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती देता येणार नाही, असं काँग्रेसचे नेते सांगत आहेत. राहुल गांधी यांनाच हा यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागेल असं अनेक काँग्रेस नेते खासगीत सांगत असल्याने यावर ते उघडपणे प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. लोकसभेमध्ये काँग्रेसचा नेता बदलण्यासंदर्भात विचार विनिमय सुरु आहे. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी या राहुल गांधींनी लोकसभेतील नेतेपदाचा स्वीकार करावा यासाठी प्रयत्न करत आहेत. राहुल यांची समजूत घालून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न त्या करत असल्याचं समजतं. राहुल गांधी यांना लोकसभेतील नेतेपद दिल्यानंतर आणि त्यांची परवानगी असेल, तर काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र ही गांधी कुटुंबाव्यतिरिक्त इतर नेत्याकडे दिली जाण्याची शक्यता या नेत्यांनी व्यक्त केली आहे. असं केल्यास काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी लोकशाही पद्धतीने पक्षाचा अध्यक्ष निवडण्याची मागणीही पूर्ण होईल असं म्हटलं जात आहे. या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून काँग्रेसमध्ये बदल करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं.