माझ्या संकटाच्या वेळी महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत – प्रताप सरनाईक यांचा आरोप

मुंबई : ५ जुलै – भाजपाशी युती करा असं पत्र लिहिल्याने खळबळ माजवणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रताप सरनाईक यांनी महाविकास आघाडीविरोधातील आपली खदखद बोलून दाखवली आहे. माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“माझ्या कुटुंबावर घाला घातला जात असताना किंवा आरोप केले जात असताना माझ्या मनात एकच विचार येत होता की, आपण महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांना उत्तर दिली. पण महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी उभे राहिले नाहीत. ते झालं नाही म्हणून मी पत्र दिलं. त्यात काही चूक केलं असं वाटत नाही,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंदर्भातील सगळ्या घडामोडीत मी आधीपासूनच होतो ही वस्तुस्थिती आहे. मातोश्रीवर आमदारांची जी बैठक झाली, तसंच शब्द दिल्याप्रमाणे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यासंबंधीची घोषणा प्रवक्ता म्हणून मीच केली. महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आमदारांच्या संपर्कात होतो. त्यानंतर ज्या ज्या वेळेस आघाडीवर विरोधकांनी आरोप केले, त्यावेळी प्रवक्ता म्हणून त्याला विरोधाचं काम मी केलं होतं. अर्णब गोस्वामीने अन्वय नाईक प्रकरण बंद केलं होतं त्याविरोधीत मी आवाज उठवला. अलिबागमधील प्रकरण बाहेर काढावं यासाठी आंदोलन केलं. कंगनाने मुख्यमंत्री, महारा ष्ट्राविषयी जे अपशब्द वापरले त्याविरोधात वक्तव्य केलं. हक्कभंगाचा ठराव मांडला. त्यामुळे विरोधी पक्षाचा मी टार्गेट होतो. माझ्या विरोधात कोणताही गुन्हा नसताना, कोणताही आरोप नसताना पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल नसताना मला टार्गेट करण्यात आलं. माझ्यामागे ईडी लावण्यात आली.”.
“या देशात किंवा कुठेही माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा तक्रार नाही. कोणीही माझ्याविरोधात जबाब दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिलं आहे. ईडीच्या कारवाईमुळे मी गायब झालो असं नाही. माझ्यावर झालेली ह्रदयरोगाची शस्रक्रिया. पत्नी कर्करोगाशी झुंज व घरात करोनाशी लढा या सगळ्यात मी अडकलो होतो. यामुळे मी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

Leave a Reply