मुंबई: ५ जुलै- सक्तवसुली संचलनालयाकडून सुरु असलेली कारवाई तसंच उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजपासोबत पुन्हा युती करण्याची मागणी करणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आज सोमवारी विधानभवनात दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
दरम्यान, यावेळी त्यांनी आपल्यावरील कारवाईचा निषेध करताना मी काही विजय माल्या वा नीरव मोदी नाही असं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या देशात किंवा कुठेही माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा तक्रार नाही. कोणीही माझ्याविरोधात जबाब दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं मला संरक्षण दिलं आहे. ईडीच्या कारवाईमुळे मी गायब झालो असं नाही. माझ्यावर झालेली ह्रदयरोगाची शस्रक्रिया आणि पत्नीची
रोगाशी झुंज व घरात करोनाशी लढा या सगळ्यात मी अडकलो होतो. यामुळे मी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता, असं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.