पावसाने दडी मारल्याने वातावरणातील उकाडा वाढला

पुणे: ५ जुलै- ऐन पावसाच्या हंगामात राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पाऊसधारा बरसण्याऐवजी अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याचे चित्र आहे. राज्यात आणखी दोन ते तीन दिवस अशीच स्थिती राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी सध्या कमी दाबाचे पट्टे आणि बाष्प नसल्याने महाराष्ट्रात गेल्या आठवडय़ापासून बहुतांश भागांत पावसाने दडी मारली आहे. पश्चिम-उत्तर भागांतील राज्यांत सध्या तापमानात मोठी वाढ झाली असून, पूर्व-उत्तर भागांत, मात्र जोरदार पाऊस होत आहे. बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अगदी उलटे चित्र महाराष्ट्रात आणि देशाच्या मध्य तसेच उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये आहे. या भागांत सध्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३८ अंशांवर गेले आहे. रविवारी राज्यात अकोला येथे उच्चांकी ३८.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. विदर्भातही तुरळक ठिकाणीच पाऊस होणार असून, काही भागांत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंशांनी वाढला असून, तापमान ३२ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीत तापमानाचा पारा वाढला आहे. कोकण विभागात मुंबई, ठाण्यासह सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी तापमान वाढले आहे. मराठवाडय़ात ओरंगाबाद, परभणीत तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस कोकण विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Leave a Reply