नेता कधीच राजकारणातून निवृत्त होत नसतो – लालूप्रसाद यादव

नवी दिल्ली : ५ जुलै – राष्ट्रीय जनता दलाचे पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी सोमवारी व्हर्च्युअली पक्षाच्या २५ व्या स्थापना दिन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. लालू प्रसाद यादव यांनी सुमारे साडेतीन वर्षानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधून भाषण केले. त्याआधी राजकारणापासून दूर असणाऱ्या ७३ वर्षीय लालूप्रसाद यादव यांनी राजकीय नेते कधी निवृत्त होत नाही असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत मार्गदर्शक मंडळावर आरएसएसचा सर्वाधिकार असल्याचे म्हटले आहे.
एका मुलाखतीत राजकारणातून निवृत्त होण्याबाबतच्या प्रश्नाबाबत लालूप्रसाद यांनी नेता कधी निवृत्त होत नाही असे म्हटले. त्यासोबत त्यांनी निवडणूक लढवणे आणि त्यात सहभागी होणे म्हणजेच राजकारण नाही असे देखील म्हटले आहे. पक्षाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार का असा प्रश्न विचारला असता त्यावर तर फक्त हाफ पॅन्टवाल्यांचा कॉपीराईट आहे. मी तर शेवटच्या श्वासापर्यंत वंचित आणि शोषितांच्या अधिकारांसाठी लढाई लढत राहिल असे सांगितले.
लालूप्रसाद यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत नरेंद्र मोदीच्या ऐवजी कोण असेल असे विचारले असता यावर “कोणीही असला तरी हुकूमशाही आणि अहंकारापासून दूर असेल. गेल्या ६ वर्षांच्या कारभारापासून हे निश्चित झाले आहे की स्वकेंद्रित आणि व्यक्तीकेंद्रित कारभार कधीही लोकशाहीची मुळे मजबूत करू शकत नाही” असे म्हटले.
मुलाखतीमध्ये लालू आणि नितीश पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला असता भविष्यात पुन्हा नितीश कुमार यांच्यासोबत जाणार नसल्याचे म्हटले आहे. “हा एक काल्पनिक प्रश्न आहे. सन २०१५ मध्ये आम्ही नितीश यांच्यासोबत असलेल्या सर्व विरोधाभासांना मागे टाकून महायुतीचा विजय निश्चित केला होता. पण नितीश यांनी अडीच वर्षांनंतर जनतेच्या त्या अभूतपूर्व निर्णयाचे काय केले, याला संपूर्ण देश साक्षीदार आहे. राजकारणातील तत्त्वे, कल्पना, धोरण आणि नशिब यांचे महत्त्व नितीश यांनी गमावले आहे,” असे लालूप्रसाद यादव म्हणाले.

Leave a Reply