नागपूर : ५ जुलै – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. नागपुरातही पुन्हा लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
नागपुरातील अनेक कोरोना लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लसींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेने अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवली आहे. गेल्या पाच दिवसांपासून नागपुरातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
एकतर स्वत:चे सर्व कामं सोडून लसीकरण केंद्रांवर यायचं आणि लसीकरण केंद्राच्या गेटवर ‘आज लसीकरण बंद आहे’ हा बोर्ड वाचायचा. त्यानंतर निराश होऊन परत जायचं, असा अनुभव सध्या हजारो नागपूरकर घेत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून नागपुरात लसीकरण बंद होतं. शनिवारी (3 जुलै) कोरोना लसीकरण सुरु झालं आहे. मात्र आता ते पुन्हा बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक लोक हे लसीकरण केंद्रावर येऊन पुन्हा माघारी परतत आहेत.