द्वेष ही हिंदुत्वाची देणगी- ओवेसींचे खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली: ५ जुलै- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी हिंदुत्व आणि झुंडबळीसंदर्भात केलेल्या प्रतिपादनावरून चर्चेला तोंड फुटले आहे. आज सोमवारी एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवेसी, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी संरसंघचालकांच्या विधानावर भाष्य केले. हा द्वेष हिंदुत्वाची देण असून, हे गुन्हेगार हिंदुत्ववादी सरकारच्याच आश्रयात आहेत, असे औवेसी यांनी म्हटलं. गुन्हेगारांना गाय आणि म्हशीचा फरक कळत नाही. परंतु त्यांना मारण्यासाठी जुनैद, अखलाक यांची नावे पुरेशी आहेत. हा द्वेष हिंदुत्वाची देणगी आहे, असे टि्वट ओवेसी यांनी केले आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही मोहन भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. व्यक्त केलेल्या मतांशी आपण प्रामाणिक असाल तर, निर्दोष मुस्लिमांवर अत्याचार करणाऱ्या सर्व नेत्यांना तातडीने त्यांच्या पदावरून काढून टाका. याची सुरवात तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यापासून करा, असे टि्वट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.
भारतीय कोणत्याही धर्माचे असले तरी, त्या सर्वांचा डीएनए हा एकच असल्याचं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत रविवारी गाझियाबाद येथे राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यक्रमामध्ये केलं. झुंडबळींमधे सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.

Leave a Reply