मुंबई : ५ जुलै – एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला आहे. ८४ वर्षीय स्वामी हे बऱ्याच आजारांनी ग्रस्त होते. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात स्टॅन स्वामी यांना ९ ऑक्टोबर २०२० ला रांचीमधून अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयात एका डॉक्टरनं सुनावणी दरम्यान याबाबतची माहिती दिली. आजच स्टेन यांच्या जामिन याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरु होती.
गेल्या वर्षी त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना उपचारासाठी मुंबईच्या हॉली फॅमिली हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र आज दुपारी 1.30 वाजता त्यांचं निधन झालं.
4 जुलै रोजी सकाळी स्वामी यांना कार्डिअॅ्क अरेस्टमुळे व्हेंटिलेटर ठेवण्यात आले. तेव्हा पासून बेशुद्ध होते. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.
2 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना तळोजा मध्यवर्ती कारागृहातून खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करा, असं निर्देश दिले. निर्देशानंतर त्यांना वांद्रे येथील हॉली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्टॅन स्वामी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा मेडिकल रिपोर्ट ब्रीच कॅण्डी रुग्णालयानं मुंबई उच्च न्यायालयात सादर केला होता.
न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान स्वामींच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयानं म्हटले आहे की, ‘स्टॅन स्वामी यांचं निधनाचं वृत्त ऐकून आम्हाला वाईट वाटलं. आम्हाला धक्का बसला आहे.
यानंतर न्यायालयानं वकिलाच्या विनंतीवरून सेंट झेवियर्स कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य फादर फ्रेझर मस्करेनास यांच्याकडे स्वामींचा पार्थिव देण्याचा निर्णय घेतला.