आजही अनिल देशमुख ईडी चौकशीला गैरहजर

मुंबई: ५ जुलै- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) उपस्थित राहण्यासाठी तिसऱ्यांदा समन्स बजावून, आज सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले, मात्र, अनिल देशमुख यांनी त्यांच्याविरोधात सुरु असलेली चौकशी ही पारदर्शी नसल्याचे ईडीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच, आजही चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
देशमुख यांनी ईडीला पत्राद्वारे लिहिले आहे की, माझ्या अर्जावर काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. म्हणून त्याचा निर्णय येईपर्यंत थांबावे लागेल.
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात कठोर कारवाई केली जाऊ नये, यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी देशमुख यांना समन्स जारी करून ५ जुलै रोजी दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे असे सांगितले होते. ईडीने देशमुख यांना आतापर्यंत ३ नोटिस जारी केल्या आहेत. या प्रकरणात कठोर कारवाईपासून आपल्याला संरक्षण मिळावे, याकरता ७२ वर्षांचे देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे त्यांचे मुंबईतील वकील इंदरपाल सिंग यांनी सांगितले.

Leave a Reply