मान्सूनने मारली दडी, शेतकरी हवालदिल

अमरावती, ५ जुलै- सुरवातीला रोहिणी व मृग नक्षत्रात दमदार असलेला वरुणराजा बेपत्ता झाल्याने अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील बळीराजा चिंतेत पडला आहे. कोरोना महामारीसोबत मुकाबला करतांना आपल्या शेतीच्या मातीत घाम गाळून नवीन खरीप हंगामाची तयारी बळीराजाने केली. सर्व प्रकारची तडजोड करून पीक पेरणीची तयारीही केली. सोयाबीनचे बियाणे, तूर, मूग, उडीद, कपाशी इत्यादी खूप चढ्या भावाने खरेदी करून पेरणी केली. मात्र, सुरुवातीला धुमधडाक्यात एंट्री घेणारा मान्सून आता रखडला आहे. मान्सूनची गती मंदावल्याने कर्ज काढून शेती कसणारा बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे. मागील वर्षी विमा कंपन्यांनी केलेली फसवणूक, बोगस बियाण्यांमुळे झालेले नुकसान, सोयाबीनवरील येलो मोझॅक, गुलाबी बोंडअळीचा विळखा अशा अनेक संकटातून सावरत असताना मान्सूनने चिंतेत टाकले आहे.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, अचलपूर, चिखलदरा तालुक्यातील पेरणी जवळपास आटोपली असता, पंधरा दिवस उलटूनही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी सर्व स्तरातून हवालदिल झाला आहे. आधीच कोरोना महामारीने ग्रासले होते, आता या पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, यातून बाहेर पडण्याची वाट बळीराजा शोधत आहे.

Leave a Reply