महाराष्ट्राला अतिरिक्त दीड कोटी कोरोना लसी पुरवा – राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

मुंबई, ३ जुलै- महाराष्ट्राची लसीकरणाची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी राज्य सरकारने एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.
लसीकरणात महाराष्ट्र हे देशात सातत्याने प्रथम क्रमांकावर राहिले आहे. आजघडीला तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे महाराष्ट्रात लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा केल्यास राज्यातील लसीकरण नियोजित वेळेत पूर्ण करता येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. पुरेशी लसीकरण केंद्रे तसेच लसीकरण नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात देशभरात १२ कोटी लस डोस वितरण होणार असून, त्यापैकी १ कोटी १५ लाख डोस महाराष्ट्राला दिले जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात जुलै महिन्यात रोज सरासरी ३ लाख ७० हजार लोकांचे लसीकरण होऊ शकते. आरोग्य विभागाने रोज १० ते १२ लाख लोकांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे व आवश्यकतेनुसार १५ लाख लोकांना रोज लस देता येईल असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना पत्र लिहून, महाराष्ट्राला जादा लसीचे डोस देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply