घ्या समजून राजेहो – नेहरू विचारांची झापडे बाजूला ठेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासा

2 july sawarkarकाही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक युट्युब ची लिंक बघण्यात आली ती लिंक एका पंचफुला प्रकाशन नामक संस्थेने प्रसारित केली आहे मात्र यातील निवेदक कोण हे नाव कळू शकलेले नाही. यात निवेदकाच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्यवीर सावरकर या महान व्यक्तिमत्वाला दिलेली स्वातंत्र्यवीर ही उपाधी इतर कुणीही दिलेली नसून त्यांनी स्वतःच ती आपल्या नावामागे १९३३ साली लावून घेतली आहे. रत्नागिरीच्या पतित पावन मंदिरातील एका सहभोजनाच्या कार्यक्रमात सावरकरांनी ही पदवी आपल्याला लावून घेतली असा दावा करीत तात्याराव सावरकरांच्या एका नियतकालिकातील कथित मजकुराचा हवाला त्यांनी दिला आहे. कुणी जेठ जगन्नाथ नामक अभ्यासकाने या संदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकली आहे असेही या निवेदकाचे म्हणणे आहे. मात्र मी फेसबुकवर शोधले असता जेठ जगन्नाथ या नावाने कोणतेही फेसबुक अकाउंट सापडलेले नाही.

2 july sawarkar 1स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशातील स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर सामाजिक सुधारणांच्या संदर्भात असलेले योगदान कुणालाच नाकारता येणार नाही. तरीही काही हितसंबंधी लोक राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन सावरकरांवर विविध आरोप करीत असतात. हा आरोपही आहे. मात्र हा आरोप किती निरर्थक आणि बिनबुडाचा आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक अभ्यासकांशी चर्चा केल्यावर लक्षात येते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःलाच स्वातंत्र्यवीर ही पदवी १९३३ साली सवुन घेतली असा दावा सदर व्हिडिओत केला आहे. सावरकरांचे एक अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्या माहितीनुसार सर्वप्रथम कुणी पी. साईनाथ नामक व्यक्तीने हा व्हिडीओ प्रसारित केला होता. मात्र सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी १९२४च्या फेब्रुवारी महिन्यातच प्रदान करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९२४ साली एका समारंभात कवी वैशंपायन आणि नाटककार वामनराव जोशी यांनी सावरकरांना ही पदवी प्रदान केली होती. त्यांनी दिलेल्या दुसऱ्या संदर्भानुसार १५ ऑगस्ट १९२४ रोजी सावरकरांचे एक संक्षिप्त चरित्र सदाशिव राजाराम रानडे यांनी लिहिले होते आणि साहित्य सम्राट न चि उपाख्य तात्यासाहेब केळकर यांनी प्रस्तावना दिली होती. या चरित्राचे मुखपृष्ठ बघितल्यास त्यात स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर असा स्पष्ट उल्लेख दिसतो सदर पुस्तकाचे स्क्रीन शॉट्स सोबत जोडले आहेत. savarkar.org या वेबसाईटवरही हे पुस्तक उपलब्ध आहे. यावरून ही पदवी १९२४चिंच आहे हे स्पष्ट होते.

2 july sawarkar 2स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दुसऱ्या एक अभ्यासक डॉ. शुभा साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै १९२४ मध्ये रत्नागिरीत प्लेगची साथ आल्यामुळे सावरकरांना काही काळ नाशिकला स्थानांतर करावे लागले होते. त्यावेळी नाशिकजवळच्या येवला येथील राष्ट्रीय शाळेच्या वार्षिक समारंभात सावरकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्यावेळी काशिनाथ रघुनाश वैशंपायन यांनी सावरकरांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर म्हणून केला होता या संदर्भात डॉ. बा वा दातार यांच्या दोन तात्या या पुस्तकात उल्लेख केला असल्याची माहितीही डॉ. शुभा साठे यांनी दिली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव या ग्रंथाचे लेखक अक्षय जोग यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात १९२४मध्ये कवी वैशंपायन यांनी सावरकरांवर रचलेल्या एका कवितेतही स्वातंत्र्यवीर असाच उल्लेख केल्याची माहिती दिली. त्याच प्रमाणे ४ सप्टेंबर १९२४ च्या स्वातंत्र्य या नियतकालिकाच्या अंकातही स्वातंत्र्यवीर सावरकर कुंडली विचार हा प्रभाकर चिटणीस यांचा लेख प्रकाशित झाला आहे. यातही स्वातंत्र्यवीर सावरकर असाच उल्लेख करण्यात आला असल्याचे अक्षय जोग यांनी ठामपणे सांगितले. या संदर्भातील पुरावे त्यांच्या आक्षेप आणि वास्तव या पुस्तकातही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2 july sawarkar 3स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असे विविध आक्षेप आजवर घेतले गेलेले आहेत. त्यात प्रमुख आक्षेप हे असे की महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहभाग होता. आणि दुसरा आरोप असा की काळ्यापाण्याची शिक्षा कमी करून घेण्यासाठी सावरकरांनी तत्कालीन इंग्रज सरकारला माफीनामा लिहून दिला होता. हे दोन आरोप वारंवार केले जातात. मात्र या आरोपांबाबतही काहीही तथ्य नसल्याचे अभ्यासकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यात प्रचंड मतभेद होते. देशाचे होणारे विभाजन आणि मुस्लिमांचे केले जाणारे लांगुलचालन हे सावरकरांना मान्य नव्हते सावरकरांना अखंड हिंदुस्थान हवा होता. ज्याप्रमाणे गांधी आणि सावरकरांचे मतभेद होते तसेच नेहरू आणि सावर्करांमध्येही होते. नेहरूंना या देशाची सत्ता कायम आपल्या परिवाराकडे हवी होती. आणि त्यात अडथळे आणू शकेल अशी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हिटलिस्टवर होती. पाकिस्तान मुस्लिमांसाठी दिल्यावर भारतात मुल्सिम नसावे आणि असलेल्या मुस्लिमांचे अकारण लांगुलचालन केले जाऊ नये हे सावरकरांचे मत होते यातून सावरकरांचे देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंमध्ये महत्व वाढू शकते ही भीती नेहरूंच्या मनात होती त्यामुळे सावरकर हे कायम नेहरूंच्या हिटलिस्टवर होते. गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचे आणि सावरकरांचे नियमित संबंध होते. तसेच गोडसे हे संघाचे स्वयंसेवक देखील होते. याचा बादरायण संबंध जोडून संघावर जशी बंदी घातली गेली. तसेच सावरकरांना आरोपी करून त्यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात चाललेल्या खटल्यात सावरकर निर्दोष सुटले होते. यावेळी डॉ. आंबेडकर हे देशाचे कायदामंत्री होते. या खटल्यात सावरकरांचे वकील ऍड. भोपटकर यांना एक दिवस आंबेडकरांनी बोलावून घेतले होते आणि या प्रकरणात सावरकर निर्दोष आहेत याची मला खात्री आहे मात्र केंद्रातील एका मोठ्या नेत्याच्या आग्रहामुळे त्यांना जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. ही माहिती खुद्द भोपटकरांनीच दिली असल्याचीही जाणकारांनी सांगितले आहे.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

Leave a Reply