ओबीसी आरक्षणासंदर्भात झारीतील शुक्राचार्य कोण? – चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

नागपूर : २ जुलै – ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत नाही. यात सरकारमधील नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करत आहे, असे म्हणताात, मग अजून काही का होत नाही. कोण आहे झारीतील शुक्राचार्य ज्याला ओबीसीना आरक्षण मिळू द्यायचे नाही?, असा सवाल भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. यात २०२२ नंतर होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ द्यायच्या आहे. यात मोठे षडयंत्र आहे. कोणीतरी मोठा व्यक्ती या मागे आहे. याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घेऊन जनतेला सांगावे. काही प्रश्न ओबीसी आरक्षण संदर्भात आहे. त्याचे उत्तर द्यावे, असेही बावनकुळे म्हणाले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
लोणावळा येथे झालेल्या चिंतन शिबिरात शेवटच्या दिवशी ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ओबीसीचा इंपेरिकल डेटा तयार करण्याचे काम चालू करणार असा निर्णय झाला. परंतू राज्य मागासवर्गीय आयोगाचे डेटा तयार करण्याचे काम सुरू झालेले नाही. यामुळे यात काळेबेरे आहे, म्हणून उशीर होत आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी तैलिक महासंघाच्या वतीने राज्यभर निदर्शने केली जाणार आहे. ज्या संघटना ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असेल, त्यांच्या पाठीशी भाजपा राहणार असेही ते म्हणाले. यात राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून इंपेरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू केले आहे आणि तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले पाहिजे, परंतू असे अजूनही झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका अद्याप रद्द झाल्या नाही. एकदा या निवडणुका झाल्या तर मग सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार प्रिसिडेंट तयार होईल. यानंतर सर्व निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाशिवाय होणार, असेही बावनकुळे म्हणाले. यामुळे हे सरकार केवळ बोलण्याचे काम करत आहे. बाकी काहीच करत नसल्याचा आरोपही यावेळी बावनकुळेंनी केला आहे.
ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केली. यात कोण अडचणीत येणार यावर काहीच बोलायचे नाही. जेव्हा कोणी तक्रार करतो, तेव्हा अशा प्रकारच्या यंत्रणा काम करतात. ईडीकडे भारतीय जनता पार्टीने तक्रार केलेली नसून कोणीतरी सामाजिक क्षेत्रातला वकील, राज्याचे हित जोपासणारे लोक या तक्रारी करतात. जर ईडीला वाटत असेल तर यात काही गैरप्रकार झाला आहे, तर कारवाई होईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Leave a Reply