नवी दिल्ली : २ जुलै – दहशतवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये स्फोट केल्यानंतर पाकिस्तानची आणखी कुरापत समोर आली आहे. गेल्या आठवड्यात इस्लामाबादमधील भारतीय दुतावासावर ड्रोन फिरत असल्याचे आढळले होते. या घटनेचा भारताने निषेध केला आहे.
भारतीय दुतावासावर ड्रोन फिरणे म्हणजे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे. याबाबत भारतीय दुतावासाने पाकिस्तानच्या यंत्रणेला जाब विचारला आहे. दहशतवाद्यांनी ड्रोनच्या मदतीने जम्मूमधील एअर फोर्स स्टेशनमध्ये २७ जूनला दोन स्फोट घडवून आणले होते. त्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणेत ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सहज उपलब्ध होणाऱ्या ड्रोनने देशातील सुरक्षेच्या आव्हानांमध्ये गुंतागुंत वाढली आहे भारतीय सैन्यदलाकडून ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी यंत्रणा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली. ते थिंक टँकमध्ये बोलत होते. सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले, की सुरक्षा आस्थापनांना आव्हानांची माहिती आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. एखाद्या देशाने किंवा देशाने पुरस्कृत करून तयार केलेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी यंत्रणा आम्ही विकसित करत आहोत. कायनेटिक आणि नॉन कायनेटिक या दोन्ही प्रकारच्या ड्रोनचा सामना करण्यासाठी ही यंत्रणा विकसित होणार आहे.