इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात शिवसेनेचे आंदोलन

अकोला : २ जुलै – राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये चांगलीच चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खरंतर, एकीकडे कोरोनाचा जीवघेणा संसर्ग तर दुसरीकडे मराठा व ओबीसी आरक्षण आणि इंधन दरवाढीवरून वातावरण तापलं आहे. अशात आता अकोल्यामध्ये शिवसेनेकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे.
अकोला शहरात शिवसेनेच्यावतीने पेट्रोल, डिझेल खाद्यतेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात साप्ताहिक आंदोलन केल्यानंतरसुद्धा केंद्रीय सरकारचे डोळे उघडले नाही. यामुळे भाजप सरकारला सदबुद्धी मिळून लोकांचे दुःख समजण्याकरिता आई भवानी पुढे सेनेने होम हवन करून साप्ताहिक आंदोलनाची सांगता केली आहे.

इंधन, गॅस सिलिंडर, खाद्यतेल आदींची दरवाढ झाल्याने कोरोनाच्या काळात मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेने साप्ताहिक आंदोलनाअंतर्गत गेल्या सात दिवसांपासून आंदोलन केलं. मात्र, आंदोलनाची दखल अध्यापर्यंत केंद्र सरकारने घेतली नसून आजही घरगुती गॅसमध्ये 25 रुपयांनी वाढ केली आहे.
यामुळे केंद्र सरकारला सदबुद्धी मिळण्याकरिता सेनेच्या वतीने आज आंदोलनाच्या आठव्या दिवशी शहराच्या मधोमध असलेल्या गांधी चौकातील आई भवानी मंदिरात होम हवन करून आंदोलनाची सांगता केली. मात्र, आंदोलनाची दखल केंद्र सरकारने न घेतल्यास शिवसेना कार्यालयात याबाबत सेनेचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख यांच्यासह नियोजन बैठक घेण्यात येऊन पुढील आंदोलन हे ग्रामीण भागातून छेडण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.
कोरोना काळात आधीच नागरिकांवर आर्थिक संकट असताना इंधन आणि घरगुती गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, व्यवसाय बंद झाले. असं असतानाही केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आहे आहेत. अशात जर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ केली तर जगायचं कसं हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे. यावर आता दोन्ही सरकार तोडगा काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Leave a Reply