माझ्यावर दगडफेक म्हणजे प्रप्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला – गोपीचंद पडळकर

सांगली : १ जुलै – सोलापूर इथं बुधवारी सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या दगडफेकीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनी काल रात्रीच ट्वीट करून राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला होता. आता खुद्द पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्याच्या संदर्भात ट्वीट केलं आहे. ‘प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला…’ असं या दगडफेकीचं वर्णन पडळकरांनी केलं आहे. अशा भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता, ना आज दबला आहे, ना उद्याही दबेल… घोंगडी बैठका सुरूच राहणार…,’ असं त्यांनी पुढं म्हटलं आहे. ट्वीटसोबत त्यांनी आमदार रोहित पवार व त्यांच्या एका कार्यकर्त्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळं त्यांचा थेट रोख रोहित पवार यांच्याकडं असल्याचं बोललं जात आहे.
गोपीचंद पडळकर यांनी सध्या बहुजन संवाद दौरा सुरू केला आहे. त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ते घोंगडी बैठका घेत आहेत. काल सकाळी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत असं मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, असा बोचरा टोला पडळकर यांनी हाणला होता. राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांचा डीएनए बहुजन विरोधी असल्याचंही ते म्हणाले होते. पडळकरांनी केलेल्या या टीकेमुळंच त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली असावी, असं बोललं जात आहे.

Leave a Reply