भंडारा:१ जुलै- धान केंद्रांवरील अनियमिततेमुळे यंदाची खरीप आणि रब्बी धान खरेदी प्रभावित झाली. उन्हाळी धान खरेदीची मुदत ३० जून रोजी संपली तरी, अर्धेअधिक शेतकर्यांचे धान खरेदीच करण्यात आले नाही. उन्हाळी धान खरेदीची मुदत वाढविण्यात येऊन सर्वच शेतकर्यांचे धान खरेदी करण्यात यावे, या मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील बारव्हा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
रब्बी हंगाम अंतर्गत शासनाच्या किमान आधारभूत योजनेनुसार उन्हाळी धान खरेदीसाठी जिल्ह्यात १२९ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. लाखांदूर तालुक्यात १६ आधारभूत धान केंद्र सुरू झाले. मात्र सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे हजारो शेतकरी धान खरेदीपासून वंचित राहिले. आजघडीला २0 हजार शेतकर्यांच्या फक्त ८ लक्ष क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून शासन तथा जिल्हा पणन विभागाद्वारे धान खरेदी केंद्रांना बारदाण्याचा पुरवठा न करण्यात आल्याने धान खरेदी बंद पडली आहे. उन्हाळी धान खरेदी न झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धान खरेदीकरीता बारदाण्याचा पुरवठा करुन धान खरेदीकरीता मुतदवाढ मिळण्यासाठी माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात बारव्हा येथे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.