मुंबई : १ जुलै – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता ईडीकडून उर्जामंत्री नितीन राऊत यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. नितीन राऊत यांनी अर्थिक गैरव्यवहार केला असल्याची तक्रार ईडीकडे दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार डॉ. तरुण परमार यांनी ईडीकडे केली.
ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि त्यांचे पीए यांनी अर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर केला, असा आरोप करत, मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी वकील परमार यांनी केली. अवैध गौण खनिज उत्खनन, पोलिसांच्या बदल्या, सरकारी जमिनीवर कब्जा करणे, अशा अनेक तक्रारींची यादी परमार यांनी ईडीकडे दिली आहे. यात मोठा भ्रष्टाचार आणि अर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे.
नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत हा के.के. पॉवर, ए.के. लॉजिस्टिक्स व बग्गील या कंपन्यांमार्फत वीज विभागासंबंधी कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार कंत्राटामार्फत करीत आहेत. या कंत्राटातील हा गैरव्यवहार ५०० ते ६०० कोटी रुपयांचा आहे, असा आरोपही परमार यांनी केला. या सगळ्या बाबींची चौकशी करण्याची मागणी वकील परमार यांनी केली आहे.