मुंबई : ३० जून – पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. तर, १२ नामनिर्देशित आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले? असा सवाल नाना पटोले यांनी राज्यपालांना केला आहे.
पाच आणि सहा जुलै, या दोन दिवशी राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष पद तातडीने भरले जावे, अशी सूचना करणारे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.
राज्यपाल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात. मात्र, राज्य सरकारकडून 12 नामनिर्देश सदस्यांबाबत पत्रावर अद्यापही काही निर्णय घेत नाहीत. राजभवन हे भारतीय जनता पक्षाचे कार्यालय झाले असल्यासारखे राज्यपाल वागत आहेत, असा टोला नाना पटोले यांनी राज्यपालांना लगावला. राज्यपाल हे सैविधानिक पद आहे. या पदावर बसणाऱ्या व्यक्तींनी पदाची गरिमा ठेवणे गरजेचे आहे. मात्र, राज्यपालांना त्याचा विसर पडला आहे, असा चिमटा नाना पटोले यांनी काढला. पण, काँग्रेस पक्षाकडून नेहमीच राज्यपालपदाच्या गरिमेबाबत आदर ठेवण्यात येतो, असेही नाना पटोले म्हणाले आहे.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला होणार आहे. या अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी विरोधकांची मागणी आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत पत्राद्वारे आठवण करून दिली आहे. तसेच, अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती द्या, अशा सूचना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.