लसीकरण नाही तर सुविधा नाही – ग्रामपंचायतीचा फतवा

गोंदिया : ३० जून – लसीकरण नाही तर सुविधांचा लाभ ही मिळणार नाही. ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या सर्व प्रमाणपत्रे तसेच रेशनपासून ही मुकावे लागणार आहे. असा फतवा खोडशिवानी ग्रामपंचायतने काढला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी गावाने कोरोना लसीकरणबाबत ग्रामसभेत नवा ठराव घेतला आहे. नागरिकांनी लसीकरण न केल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय दाखले आणि रेशन न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक प्रकारचा ग्रामवासीयांसाठी एक फतवाच आहे. त्यामुळे आता गावात एकच खळबळ उडाली असून याचा परिणाम म्हणून गावात कोरोना लसीकरणाला वेग आला आहे. कोरोनाचे लसीकरण न केल्यास गावातील नागरिकांना सोयीसुविधा रोखणारे राज्यातील खोडशिवनी हे पहिलेच गाव आहे. असे म्हटले तरी काही हरकत नाही.
खोडशिवनी हे गाव आपल्या नव्या निर्णयाने आता राज्यभर चर्चेत आले आहे. गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने गावाच्या वेशीवर येऊ नये. यासाठी गावातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे. यासाठी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील 45 वर्षे वयोगटाच्या लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये गावातील कित्येक नागरिकांनी लस उपलब्ध असतानाही घेतली नसल्याचे दिसून आले. यामुळे गावात 100 टक्के लसीकरणात अडचण होत असल्याचे समोर आले आहे. लस न घेणारे कोरोना वाहक म्हणून गावात राहतील व गावात कोरोना प्रादुर्भावाचा धोका राहणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हे दाखवून दिले आहे.
गावकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी 100 टक्के लसीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी गावात आयोजित लसीकरण शिबिरात गावातील संपूर्ण लाभार्थ्यांनी लसीकरण करण्याचे ठरवले आहे. तसेच जो व्यक्ती लस घेणार नाही. त्याला सरपंच, पोलीस पाटील व तलाठी कोणते ही दाखले देणार नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानदार रेशन सुद्धा देणार नाही. असा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply