मध्यप्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांच्या तऱ्हेवाईक उत्तराने पालक संतप्त

भोपाळ : ३० जून – मध्य प्रदेशात शाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं जात असल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालक संघटनेला शाळा शिक्षणमंत्री इंदर सिंग परमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. जर शिक्षण विभाग आमचं म्हणणं ऐकून घेणार नसेल तर काय करावं असं विचारलं असताना शिक्षणमंत्री इंदर सिंग यांनी जाऊन मरा असं उत्तर दिलं. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे जर इंदर सिंग परमार यांनी स्वत: राजीनामा दिला नाही तर त्यांनी मंत्रीमंडळातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
मध्य प्रदेश पालक महासंघाच्या नेतृत्वात ९० ते १०० पालक इंदर सिंग परमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी पालकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शाळा जास्त फी घेत असल्याची तक्रार केली. मध्य प्रदेश हायकोर्टाने करोना महामारीदरम्यान शाळांना अतिरिक्त फी घेऊ नये असा आदेश दिला आहे.
पालकांनी यावेळी इंदर सिंग परमार यांना मध्यस्थी करत फी कमी करण्यासाठी मदतीची विनंती केली. करोना संकटामुळे सध्या दैनंदिन खर्च भागवताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. शाळा शिक्षण विभागच आपलं ऐकून घेत नसेल तर काय करावं असं यावेळी पालकांनी विचारलं असता चिडलेल्या इंदर सिंग परमार यांनी, “जा आणि मरा…तुमची जी इच्छा आहे ते करा,” असं उत्तर दिलं.
पालक महासंघाचे अध्यक्ष कमल विश्वकर्मा यांनी यावेळी इंदर सिंग परमार यांनी पालकांची माफी मागितली पाहिजे तसंच गाऱ्हाणं ऐकण्याची इच्छा नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनीदेखील टीका केली असून इंदर सिंग परमार यांना निर्लज्ज म्हटलं आहे. त्यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Leave a Reply