मुंबई:३० जून- पावसाळी अधिवेशनाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, ५ आणि ६ जुलैला सुरुवात होणार आहे. मागील अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे, विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल आठवण करून दिली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा तसंच विधानसभा अध्यक्षपद निवडणूक याविषयांबाबत निवेदन दिले होते. आज बुधवारी याच संदर्भात राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होणार असून, मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असून हे पद रिक्त आहे, याची आठवण करुन देण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला सदर पत्र लिहिले आहे. या आधीही राज्यपाल कोश्यारी यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या रिक्त संदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवले होते. पण, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होत असल्याने त्याआधी राज्यपाल यांनी महाविकास आघाडी सरकारला स्मरण करून दिले आहे.